जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । जळगावात भरधाव वेगाने डंपर चालविले जात असून या डंपरमुळे अपघात होऊन अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. यातच आता जळगाव ते नशिराबाद रोडवरील राणे हॉटेल जवळ चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. तेजस युवराज बिऱ्हाडे (वय २२) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील रहिवासी तेजस बिऱ्हाडे हा त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे (वय १९) आणि मित्र अजय अफलातून सपकाळे (वय २२) यांच्यासोबत आज दुपारी ३.१५ सुमारास दुचाकीवरून नशिराबादहून जळगावकडे येत होता. त्याचवेळी जळगावकडून नशिराबादकडे जाणाऱ्या एका भरधाव डंपरने अचानक विरुद्ध दिशेने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत तेजस बिऱ्हाडे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे आणि मित्र अजय सपकाळे हे दोघे गंभीर जखमी झाले. या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच तेजस आणि तुषार यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच आक्रोश केला.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अपघात घडवणारा डंपर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.