जळगाव लाईव्ह न्यूज । रब्बीतील नवीन गहू बाजारात दाखल झाला असून मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधला गेल्याने सध्या भाव स्थिर आहे तर, एप्रिलला आवक वाढल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ हजार हेक्टरवर अधिक गव्हाचा पेरा करण्यात आला. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली असून सध्या गव्हाला ३२०० ते ३४०० रुपये भाव मिळत आहे.

गेल्यावर्षी गव्हाचे क्षेत्र ६० हजार ६८४ हेक्टर होते तर यावर्षी ९५ हजार २०० हेक्टरवर पेरा झाला. त्यामुळे स्थानिक गव्हाला देखील चांगली मागणी राहील. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून दररोज पंधरा ते वीस ट्रक गव्हाची आवक सुरु असून खरेदीला वेग आला आहे. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने उत्पादनदेखील चांगले आहे. होळीनंतर गव्हाची प्रामुख्याने आवक वाढते.

एप्रिलमध्येच खरेदी का?
आर्थिक निकड, साठवणुकीची व्यवस्था नसल्याने शेतकरी रब्बीतील पीक काढल्यानंतर लगेच बाजारात विक्रीसाठी आणतात. मागणी व आवक समतोल राहिल्यास कामगारांसह नोकरदारांना किफायतशीर दराने वर्षभराचे धान्य खरेदी करणे शक्य होते. त्यामुळे एप्रिलमध्ये धान्य खरेदीला वेग येतो, किफायतशीर दरामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.







