शेतकरी आंदोलनाचा असाही फटका! जळगावहून जम्मू काश्मीर जाणारे प्रवासी रेल्वेत अडकले
जळगाव लाईव्ह न्यूज । पंजाबमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका रेल्वेवरही दिसून आला आहे. या आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. याच दरम्यान जळगाव येथून 29 डिसेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या दिशेने निघालेली झेलम एक्सप्रेस जालंदरजवळ तब्बल 11 तास पडून होती. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
पुण्यावरुन २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.४० वाजता झेलम एक्स्प्रेस निघाली. ही गाडी २९ डिसेंबरच्या रात्री दोन वाजेल भुसावळात पोहोचली. ही गाडी जालंधर कॅन्ट रेल्वे स्थानकावर दुसऱ्या सकाळी ७.२० वाजता पोहचली. त्या गाडीची पोहचण्याची वेळ सकाळी ५.१० होती. जालंधरला पोहचल्यावर दुपारी चार वाजेपर्यंत झेलम एक्स्प्रेस जालंधर रेल्वे स्थानकावर थांबवली गेली. तब्बल ११ तास ही ट्रेन जालंधर रेल्वे स्थनावर उभी होती. 11 तासानंतर झेलम एक्सप्रेस पठाणकोटच्या दिशेने रवाना झाली आहे.
प्रवाशांचे हाल
झेलम एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अनेक तास ट्रेनमध्येच बसून राहावे लागले.त्यानंतरही रेल्वेकडून प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा दिल्या गेल्या नाही. ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ आणि पाणी मिळणेही प्रवाशांना अवघड झाले. झेलम एक्स्प्रेसमध्ये लष्कराचे जवान होते. ते कर्तव्यावर जात होते. त्यांच्यासाठीही काहीच पर्यायी सुविधा करण्यात आली नाही.