जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२४ । सध्याच्या घडीला फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सायबर ठगांकडून अनेकांना शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालत आहे. आता असाच एक प्रकार भुसावळमधून समोर आला आहे. व्यापाऱ्याला शेअर खरेदी विक्रीचा नाद लावून वेगवेगळ्या ट्रेडिंग व्हॉटस्ॲप ग्रुपवर ॲड केले. त्याच्या माध्यमातून खोटी माहिती देत गेल्या आठ महिन्यांत तब्बल ३४ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी जळगावच्या सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.
भुसावळच्या शांतिनगरात फिरके हॉस्पिटलशेजारी प्रशांत मोहनलाल अग्रवाल (वय ५०) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. त्यांच्या मोबाईलवर ऐश्वर्या शेरे नामक तरुणीने संपर्क केला. शेअर बाजारावर नियंत्रण आणि टॉप- टेन शेअर रेटींगवर गुंतवणुकीचे आमिष दाखवून जास्तीत जास्त नफा देण्याचे आमिष तरुणीने दिले. कथित कंपनीतील ज्योती नावाच्या अकाउंटंटने वेगवेगळ्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर ॲड करून शेअर मार्केटच्या ट्रेडिंगच्या बनावट लिंक शेअर करत त्याद्वारे पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
दरम्यान ऐश्वर्या आणि ज्योती यांच्या सांगण्याप्रमाणे १ एप्रिल २०२४ पासून ते आजपर्यंत प्रशांत अग्रवाल यांनी तब्बल ३४ लाख रुपये वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीसाठी ऑनलाइन अदा केले. गेल्या आठ महिन्यांत वेळोवेळी पैसे देत असताना शेअर बाजारातील स्टेट्स (ऐपत) तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. गुंतवणुकीचा लाभ तर मिळालाच नाही; उलट गुंतवणूक केलेली रक्कमही लाटल्याचे लक्षात आल्यावर अग्रवाल यांनी जळगावच्या सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.