जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झालीय. संध्याकाळच्या ६ वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येणार आहे. मात्र दुसरीकडे मतदानाच्या दिवशीच महाविकास आघाडीत काँग्रेसने उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. तो म्हणजे सोलापूर, रामटेक मतदारसंघात ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराऐवजी काँग्रेसकडून अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसनं घेतलेल्या यू टर्नमुळे ठाकरेंना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या मतदारसंघात इच्छुक काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला. विशेष म्हणजे मुळक यांच्या प्रचारासाठी स्थानिक काँग्रेस खासदार, नेत्यांपासून सगळेच प्रचारात दिसून आले. मतदानाच्या आदल्यादिवशी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी मतदारांना आवाहन करत अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना मत देण्याचं आवाहन केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे.
केवळ रामटेकमध्ये नाही तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातही ऐनवेळी ठाकरेंना धक्का देण्यात आला आहे. खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा जाहीर करत विजयी करण्याचं आवाहन केले आहे. शिंदे यांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं सांगितले जात होते. मात्र मतदानाच्या दिवशीच मविआतील कुरघोडी उघडपणे दिसून आली आहे.