⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | दर्गा पाडण्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने गुलाबराव देवकर अडचणीत; हिंदू समाजाने केली माफीची मागणी

दर्गा पाडण्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने गुलाबराव देवकर अडचणीत; हिंदू समाजाने केली माफीची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२४ । नशिराबाद येथे रविवारी झालेल्या सभेत गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत धरणगाव येथील दर्गा पाडण्याबाबत चुकीचे व वादग्रस्त वक्तव्य केले. यावरुन विश्व हिंदू परिषद व गायरान बचाव मंचने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्या देवकर यांनी त्यांचे स्वत:चे आरोप सिध्द करुन दाखवावेत किंवा हिंदू समाजाची जाहिर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत गायरान बचाव मंचने सविस्तर माहिती पुराव्यानिशी जाहीर केल्याने देवकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गायरान बचाव मंच व विश्व हिंदू परिषदने प्रसिध्द केलेल्या पत्रात म्हटले आहे की, श्री.देवकर यांनी १८ नोव्हेंबर रोजी नशिराबाद येथे झालेल्या सभेत दर्ग्याबाबत चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र वस्तूस्थिती अशी आहे की, धरणगाव येथील जो दर्गा पाडण्यात आला तो धरणगाव येथील गट क्र.१२४८/१ व १२४८/२ (नवीन गट क्र.९४३/१ व ९४३/२) या सरकारच्या गुर चरणासाठी राखीव असलेल्या व सरकारच्या मालकीच्या असलेल्या मिळकतीवर अनधिकृत, बेकायदेशीर व अतिक्रमण करून बांधलेला होता. सदर गायरान जागेवरील दर्गा पाडून सदर जागा ही गुरांना चरण्यासाठी मोकळी व्हावी म्हणून गायरान बचाव मंच, धरणगाव यांनी दिनांक ९ सप्टेंबर २०२१ रोजी म.जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावनी होवून १३ सप्टेंबर २०२१ रोजी सदरचे सरकारच्या गुरचरणासाठी आरक्षित जागेवरील अतिक्रमण हे निष्कासित करण्याचे आदेश पारित केलेले होते. परंतू धरणगाव तहसिलदार व नगरपालिका मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याने आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. दरम्यान ८ नोव्हेंबर २०२१ रोजी धरणगाव शहरात मुकमोर्चा देखील काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, असे पत्रात म्हटले आहे.

मुस्लिम समाजाचे अपिल देखील फेटाळले
त्यानंतर दि. १४ डिसेंबर २०२१ रोजी शेख रफिक शेख मुसा कुरेशी व इतर मुस्लीम समाजातील लोकांनी म.अप्पर आयुक्त सो., महसूल विभाग, नाशिक यांच्याकडे आर.टी.एस. अपील क्रमांक ५६९/२०२१ चे दाखल केले. त्यावर दोनही पक्षांचे म्हणणे ऐकून, कागदपत्रांचे अवलोकन करून तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या न्यायनिवाड्यांचे अवलोकन करून दिनांक ११ ऑक्टोंबर २०२२ रोजी आदेश पारित करून जळगाव जिल्हाधिकारी यांचा निर्णय आदेश कायम केला ज्यात दर्ग्याचे अतिक्रमण काढून टाकण्यात यावे असा आदेश केलेला होता. याचा अर्थ सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीतच राहून झाली आहे. आपण नशिराबादच्या सभेमध्ये केलेले वक्तव्य खोटे व जनतेची दिशाभूल करणारे आहे, असे विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हिंदू समाजाची माफी मागण्याची मागणी
यामुळे सदर गायरान जागा ही सरकारची होती व आहे आणि आप्पासाहेब तुम्ही सरकारच्या हिताचे रक्षण न करता मतांसाठी लाचारी पत्करून व हिंदू समाजाची दिशाभूल करून मुस्लिमांचे लांगूल चालन करत आहात हे सिद्ध होते. तसेच तुमच्या वक्तव्याप्रमाणे गावात कुठलीही दंगल झालेली नव्हती व एकही दगड फेकला गेला नाही, म्हणून तुम्ही हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी गायरान बचाव मंचचे संयोजक अमोल महाजन, सहसंयोजक राहूल पारेख व विश्व हिंदू परिषद, धरणगाव तालुका अध्यक्ष श्रीपाद पांडे यांनी केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.