डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद रूग्णालयात ४५० बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार
गोदावरी फाउंडेशन संचलित संस्थेचा उपक्रम ; बालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद रूग्णालयात आयोजित उपक्रमात ४५० बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार करण्यात आले. या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयातर्फे आयोजित सुवर्णप्राशन संस्कार या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते बालकाला सुवर्णप्राशन देऊन करण्यात आला.
यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, डॉ. निखील चौधरी, डॉ. कोमल खांडरे, डॉ. साजीया खान, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. पालवी चौधरी, डॉ. मयुरी चौधरी, मोहीत येवले, चेतन चौधरी, नितीन पाटील, सागर कोळी, मिलींद देशपांडे, भारती झोपे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. उल्हास पाटील यांनी अनेक बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार केले. सकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या उपक्रमाचा समारोप सायंकाळी ५ वाजता करण्यात आला. दिवसभरात ४५० हून अधिक बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार करण्यात आले.
सुवर्णप्राशन संस्कार कुणासाठी आवश्यक?
नवजात बालकांपासून ते १६ वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील, मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे, वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार करण्यात आले आहे.
सुवर्णप्राशनाचे असे आहेत फायदे
बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती वाढते.रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही. बुद्धी कुशाग्र , तल्लख होते. एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते. शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो. मुलांची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.
प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला होणार संस्कार
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या बालकांसाठी लाभ घ्यावा असे आवाहन आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.