जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या अपघाताची मालिका सुरूच असून अशातच रस्त्यामधील खड्डा चुकविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक जवळच असलेल्या नाल्यात उलटला. ही घटना पहूर-शेंदुर्णी रस्त्यावर घडली. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झालेली नाही. मात्र ट्रकचे नुकसान झाले.
पहूरवरून ट्रॅक (एमएच ४१, एव्ही ३५७६) शेंदुर्णीकडे जात होता. यादरम्यान, रस्त्यामधील खड्डा चुकविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक जवळच असलेल्या नाल्यात उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांची दोन, तीन महिन्यात डागडुगी करूनही खड्डे पुन्हा जैसे थे आहेत.
अर्धा रस्ता चांगला आणि अर्धा खराब असल्यामुळे अचानक समोर खड्डा आल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडते. खड्डा चुकविण्याच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनावर आदळण्याची किंवा वाहन रस्त्याच्या खाली जाण्याची शक्यता जास्त असते. रात्रीच्या वेळी तर समोरील वाहनांच्या लाईटाच्या प्रकाशामुळे खड्डे दिसतच नाहीत. वाहनधारक आपला जीव मुठीत धरून प्रवास करीत असतो. नागरिक या रस्त्यावरील पडलेले मोठमोठ्या खड्ड्यांनी बेजार झाले असून, अनेकांना अपघात होऊन खड्ड्यांमुळे दुखापत झाली आहे.