घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या..!! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाळधी खु. येथील तयार घरांच्या चावी पालकमंत्री यांच्या हस्ते सुपूर्द !
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ संप्टेंबर २०२४ । प्रत्येक माणसाच्या जीवनात एक छान सुरक्षित घर असावं हे स्वप्न असतं, ते शासनाच्या आवास योजनेतून पूर्ण होत आहे. तुम्हाला आज घर मिळाले, त्या घरात समृद्धी, जगण्याचा आनंद मिळू द्या अशा शुभेच्छा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. ते पाळधी खुर्द येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते
दोन वर्षात पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द या दोन्ही गावात एकूण मंजूर असलेल्या घरकुलांपैकी सुमारे 125 घरकुलांचे काम पूर्ण झाले असून त्यापैकी आज प्राथमिक स्वरूपात पाळधी खुर्द येथिल शनिनगरात वास्तव्यास असलेल्या सौ. कोकिळाबाई लक्ष्मण परदेशी यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते घराची चावी सुपूर्द करून गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी गटविकास अधिकारी सुशांत पाटील, ग्रा. पं. विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील, सरपंच सौ. लक्ष्मीबाई कोळी, सामाजिक कार्यकर्ते अरविंद मानकरी, शरद कोळी, चंदू माळी, विनोद पाटील, जब्बार शेख, लालाशेठ माळी, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले सूत्रसंचालन ग्रा. पं. विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक यांनी मानले.