जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील हॉटेल मयूरी गार्डनजवळ सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा मारला. यामध्ये सुमारे एक लाख ३१ हजार १४० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले तर छापा पडताच काही जण भिंतीवरून उड्या मारून फरारी झाले. याबाबत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल मयूरी गार्डनजवळ पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला मिळाली. त्यावरून उपनिरीक्षक तथा पथकप्रमुख अरुण भिसे, हवालदार प्रमोद मंडलिक, सुरेश टोंगारे, विजय बिलघे, तुषार पाटील, विक्रांत मांगडे, स्वप्नील माळी यांनी पारोळ्याचे पोलिस निरीक्षक सुनील पवार, हवालदार हिरालाल पाटील, अभिजित पाटील, अनिल राठोड, आकाश माळी यांच्या मदतीने क्लबवर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.
एक लाख ३१ हजार १४० रुपयांची रोकड, मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त केले. छापा पडताच काही जण भिंतीवरून उड्या मारून फरारी झाले. याबाबत हवालदार प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्लबचालक नितीन चौधरी, विकास महाजन, चंद्रकांत वाघ, गणेश चौधरी, दीपक लोहिरे, धनराज पाटील, संदीप जाधव, सतीश चौधरी, चंदन जैस्वाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. क्लबवर छापा पडताच जमाव जमा झाला होता. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगविले.
दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी पत्त्यांचे क्लब बिनधास्तपणे सुरू असताना, केवळ एका क्लबवर कारवाई केल्याने पोलिसांच्या कारवाईबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैध धंदे करण्यासाठी स्थानिक पोलिस प्रोत्साहन देत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.
सुरतला जाणारे डॉक्टर कुटुंब हॉटेल मयूरी गार्डनमध्ये जेवणासाठी येत असताना, पोलिसांनी त्यांच्याकडील ५० हजारांची रोकड व मोबाईल ताब्यात घेतला. डॉक्टरांनी पोलिसांच्या विनवण्या करूनही पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. रात्री अकराच्या सुमारास त्यांना केवळ मोबाईल परत केला.एका चहा विक्रेत्याचे सुमारे चार हजार रुपये पोलिसांनी काढून घेतल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.