जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२४ । गुटखा पुड्यांच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेक झाली होती. या घटनेनंतर आता जिल्हा कारागृहामधील २२ कैद्यांची नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहांमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
जिल्हा कारागृहात उपाहारगृहामधून कैदींना विविध किराणा साहित्यामध्ये गुटख्याच्या पुड्या दिल्याच्या संशयावरून जळगाव व चाळीसगाव येथील कैद्यांमध्ये धुसफुस सुरू होती. याच वादातून ३० ऑगस्ट रोजी दोन्ही गटात वाद उफाळून दगडफेक झाली होती. यामध्ये एका कैदींसह कारागृहातील पोलिस जखमी झाले होते.
याप्रकरणी दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटांतील २३ कैद्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारागृहात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारागृहातील १० कैर्दीना नाशिक कारागृहात तर १२ जणांना छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.