जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२४ । चोपडा तालुक्यातील अडावद गावालगत दर्यासमोर ३१ ऑगस्टच्या सकाळी ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी अडावद व स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी चार नशेखोरांना पकडले असून, त्यांनी खुनाची कबुली दिली. गंजोटी म्हटल्याच्या रागातून दुचाकीवरून पाडून रूममध्ये नेऊन गळा आवळून हा खून केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली ; परंतु इंक्वेस्ट पंचनाम्यात मृताच्या होती अंगावर ठिकठिकाणी मारहाणीचे व्रण, डोक्यावर, कपाळावर व कानावर गंभीर जखमा होत्या. गळा आवळल्याचे व्रण होते. या प्रकरणी चोपडा पोलिस व स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या पथकाने खून यादृष्टीने घटनेचा तपास केला.
त्यात गोपनीय माहितीवरून पाटचारी जवळील कब्रस्तानासमोर गांजा पिणारे इरफान अब्दुल तडवी, शाहरुख इस्माईल तडवी, शेख मोईन शेख मजिद व कलिंदर रशिद तडवी यांनी मृत जगदीश फिरंग्या सोलंकी (वय ४५, रा. पाटचारी, अडावद यांचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गांजाच्या नशेत जगदीश यांना शिवीगाळ केली. त्यावर जगदीश यांनी तुम्ही गंजोटी येथे का बसले असे विचारले. त्याचा राग आल्याने चौघांनी त्यांची दुचाकी लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यावेळी पळून जात असलेल्या जगदीश यांना पकडून कब्रस्तानामधील रूमच्या व्हरांड्यात व रूममध्ये नेऊन लाठ्या, काठ्यांनी मारहाण केली.
कलिंदर रशिद तडवी याने दोरीने गळा आवळून सोलंकी यांना ठार मारले. प्रेत उचलून हजरत पीरपाकरशा बाबाच्या दर्यासमोर आणून टाकल्याची कबुली दिली. चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहेत.