जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२४ । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे व्यायामशाळेत झालेल्या बाचाबाचीतून दोन गटांत हाणामारी झाली होती. यात दगड व विटांचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आणि तब्बल ४२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंदुर्णीतील व्यायामशाळेत बुधवारी, रात्री ९ वाजता दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली होती. यातून वाद वाढला आणि यावरून दोन गटांत हाणामारी झाली. दगड-विटांचा वापर झाल्याने सहा जण जखमी झाले होते. जखमींमध्ये पोकॉ. गुलाब पोपट पवार (४३) यांचाही समावेश आहे.
गुलाब पवार यांच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील ४२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १२ संशयितांना बुधवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे.
तणावपूर्ण शांतता बुधवारी मध्यरात्री चाळीसगाव विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे, तसेच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुरुवारी शेंदुर्णीत दंगा नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आले होते. पाचोरा विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे, पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक भरत दाते, उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांच्यासह पहूर व शेंदुर्णी दूरक्षेत्राचे कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. गुरुवारी गावात तणावपूर्ण शांतता असली, तरी जनजीवन सुरळीत होते.