जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२४ । जोरदार पावसामुळे जामनेर तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला असून याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आलीय. क्लाससाठी कांग नदीच्या पुलावरून पायी जात असलेल्या १८ वर्षीय तरुणीचा तोल जाऊन ती पुरात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटच्या सुमारास घडली. पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (वय १८) असे या घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव असून या घटनेने खळबळ उडाली.
याबाबत असे की, पूनम हि आज सकाळी क्लासला जाण्यासाठी निघाली असता कांग नदीच्या पुलावरून जात असतांना शेजारून वाहने ये जा करत होती. पूनम ही पुलाच्या किनाऱ्याने जात होती . त्यावेळी तिचे लक्ष पाण्याच्या प्रवाहाकडे गेले असता तिला चक्कर आल्याने ती पुलावरून नदी पात्रात पडून वाहून गेली असे प्रत्यक्षदर्शी व्यक्तींकडून माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नाना साहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटना स्थळी धाव घेऊन स्थानिकच्या नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली व अवघ्या तीन तासात मुलीचा मृतदेह खादगाव जवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेला आढळून आला . मयत पूनम बाविस्कर हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
मुलीचे आई वडील हे गरीब कुटुंबातील असून मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.