33 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसला भीषण अपघात
जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२४ । राज्य परिवहन महामंडळाच्या एसी बसला होणाऱ्या अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.
मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या शिवशाही बसला अपघात झाला. समोरून भरधाव ट्रक येताना बसचालकाने बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट चिखलात रुतून उलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र,या अपघातात 5 प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. या बसमधून तब्बल 33 प्रवासी प्रवास करीत होते. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बस परडा गाव् फाट्या नजिकच्या वळणावर आली. त्याचवेळी समोरून सुसाट वेगाने ट्रक आला. या ट्रकला बघताच बसचालकाने बस थेट रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चिखल असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यावेळी बसमधील प्रवाशानी आरडा ओरड केली.