मुक्ताईनगरात गुटखा तस्करी थांबेना ; पुन्हा एकदा लाखोंचा गुटखा पकडला
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२४ । मुक्ताईनगर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी सुरू असून त्यावर वारंवार पोलीस प्रशासनातर्फे कारवाई होत आहे. इतकेच नव्हे तर नाशिक डीआयजी यांच्या पथकानेही गुटखा तस्करींवर कारवाई केली, असे असतानाही हा प्रकार थांबत नाही. अशातच पुन्हा एकदा गुटखा तस्करी करणारे वाहन पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः हे गुटखा तस्करी करणारे वाहन पकडले असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा येतो. अशातच ५ ऑगस्ट रोजी आमदार चंद्रकांत पाटील हे चारठाण्याकडे जात असताना आमदारांच्या सुरक्षा रक्षक असलेल्या पोलिसांनी संशयास्पद कार अडवली. त्यात या वाहनातून अवैध गुटख्याची तस्करी होत असल्याचे आढळून आले.
दरम्यान आमदार पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात होंडा सिटी वाहन क्रमांक एमएच ०२ बीएम ८४२५ आणले. त्यात ४ लाख ९८ हजाराचा गुटखा आढळून आला.या मुद्देमालासह ७ लाख १३ हजाराचा एकूण मुद्देमाल जमा करण्यात आला आहे. हे वाहन मध्य प्रदेशातून भुसावळकडे जात होते, या संदर्भात मुक्ताईनगर येथील डीवायएसपी कार्यालयातील पोलीस
कॉन्स्टेबल विजय कचरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोहम्मद अमीर मोहम्मद हनीफ शेख रा. खडका रोड भुसावळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे करत आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांनी चौकशी सुरू असून तपासात सर्व समोर येईल, असे सांगितले.