जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२४ । यंदा महाराष्ट्रात १० जून रोजी दाखल होणार मान्सून यावेळी ६ जून रोजी दाखल झाला असून यानंतर अनेक ठिकाणी पाऊस कोसळताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान खात्याने आज ८ जून रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, मान्सून हा तळकोकणात पोहचला असून राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. अशातच आज शनिवारी राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुबार, या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली आणि परभणीतही पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागरपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सध्या राज्यभरात पाऊस कोसळत असला तरी, हा पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे जमिनीत ६ इंच ओलावा जाईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेऊ नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.