मिनी ट्रॅक्टरसाठी मिळणार 90 टक्के अनुदान ; जळगावातील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२३ । महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यमाने आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांच्यामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी टॅक्ट्रर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेच्या लाभासाठी बचतगटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचतगटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत 3 लाख 15 हजार ही रक्कम मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार इतकी राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या 10% हिस्सा स्वतः भरल्या नंतरच ते 90 टक्के अनुदानास पात्र राहतील.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता सहायक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महावळ रोड, मायादेवी मंदिरा समोर, जळगांव येथे संपर्क साधावा. असेही श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.