जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत भुसावळ शहरातील भुसार आळी येथील सेवानिवृत्त वृध्दाची तब्बल ९ लाख ६५ हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भुसावळ शहरातील भुसार आळी परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ विश्वास व्यकटेश वालवडकर (वय-६५) हे वास्तव्याला आहे.
वालवडकर यांची भुसावळातील शांती नगरात राहणारा प्रकाश हरीचंद्र सोनवणे यांच्याशी ओळख आहे. त्यांचा मुलगा प्रतिक वालवडकर याला रेल्वेत नोकरीला लावून देतो असे आमिष प्रकाश सोनवणे यांनी दाखविले. त्यानुसार विश्वास वालवडकर यांनी प्रकाश सोनवणे याच्यावर विश्वास ठेवला. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी सोनवणे यांना एकुण ९ लाख ६५ हजार रूपये दिली.
परंतू नोकरी बद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सेंट्रेल रेल्वेच्या नावाने बनावट व खोटी कागदपत्र तयार करून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विश्वास वालवडकर यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून प्रकाश सोनवणे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवार २ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता भुसावळ शहर पेालीस ठाण्यात प्रकाश सोनवणे याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहे.