⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

भीषण वास्तव : शिंदे सरकारच्या 24 दिवसाच्या काळात 89 शेतकऱ्यांची आत्महत्या, जळगावातील 6 शेतकऱ्यांचा समावेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । राज्यात ठाकरे सरकार कोसळून शिंदे आणि भाजपचे सरकार (shinde-bjp government) स्थापन झाले आहे. या नवीन सरकरला स्थापन होऊन 24 दिवस उलटले आहेत. मात्र या 24 दिवसाच्या काळात राज्यात तब्बल 89 (Farmer Suicide) शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची भीषण वास्तव समोर आले आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 6 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर सर्वाधिक आत्महत्या या मराठवाड्यात झाल्या आहेत.

एकीकडे सत्ता स्थापनेचा खेळ सुरु होता तर दुसरीकडे राज्यातील बळीराजा हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत होता. अतिवृष्टी, पूर अशी परस्थिती ओढावली असताना अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनाम्यांना देखील सुरवात झालेली नाही. नापिकी, कर्जबाजारीपणा यातून नैराश्य आल्याने शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही 24 दिवस उलटले तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्याला अजूनही कोणत्याही खात्याला मंत्री मिळालेले नाही. त्यात कृषी दिनानिमित्ताने १ जुलैला नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’चा पहिला संकल्प जाहीर केला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही २४ दिवसांत राज्यात तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या
२४ दिवसांत राज्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात मराठवाडा विभागात 54 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. उत्पादनवाढीसाठी शाश्वत उपाययोजनेचा आभाव आणि निसर्गाचा लहरीपणा अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मराठावाड्यानंतर यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जळगाव-6, बुलाडाणा-5, अमरावती-4, वाशिम-4, अकोला-3 तर चंद्रपूर-भंडारामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.