जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । जळगावसह खान्देशातील विविध कोविड रुग्णालयांकडे ८ कोटी २६ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यात शासकीय वैदकीय महाविद्यालयाकडे १ कोटी ६६ लाख तर जिल्हा रुग्णालयाकडे १० लाख ७५ हजार, गोदावरी फाउंडेशनकडे ४ कोटी ६६ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांनी थकबाकी भरलेली नाही. यामुळे कारवाई अटळ असल्याचा इशारा महावितरण प्रशासनाने दिला.

कोविड संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. कोरोना काळात सेंटरचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र, रुग्णालयांकडून प्रतिसाद नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन वीजजोडण्यांची १ कोटी ६६ लाख ४२ हजार ६४० रुपये थकबाकी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे १० लाख ७५ हजार ८४८ रुपये, तर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे ४ कोटी ६६ लाख ३६ हजार २२३ रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयही थकबाकीदार
धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे ८३ लाख ८० हजार ८८७ रुपये तर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे १२ लाख ६७ हजार ७६ रुपये, नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ६१ लाख ४३ हजार ३२४ रुपये वीजबिल थकीत आहे. ही थकबाकी भरण्याचे पत्र मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी या रुग्णालयांच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहे. पण योग्य प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. या मुळे आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा, कंपनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनाही हे पत्र पाठवण्यात आले असल्याचे महावितरणने कळवले आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !







