जळगाव शहर

मनपा कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज : ७ वा वेतन आयोग लागू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचार्‍यांसाठी एक गुड न्यूज आहे. पालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त अशा 3200 कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन श्रेणी लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सन 2016 पासून पाच वर्षांच्या फरकासंदर्भात लवकरच पालिका धोरण ठरवणार आहे. तर जानेवारी 2021 पासूनचा फरक चालू महिन्यापासून अदा केला जाईल. सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचार्‍यांच्या पगारात तीन ते सात हजारांची वाढ होणार आहे.

राज्य शासकीय कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्यास सुरूवात झाल्यापासून महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी देखील प्रशासनासह सत्ताधार्‍यांकडे मागणी लावून धरली होती. महापालिकेने या संदर्भात महासभेत ठराव करून कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी 30 जानेवारी 2020पासून चार वेळा पत्र पाठवून सुधारीत वेतन श्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. अखेर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 8 जून रोजी आदेश जारी करत राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन श्रेणी लागू केली.

आस्थापनेवरील कार्यरत 1600 कर्मचार्‍यांच्या पगारासाठी 9 कोटी रूपये दर महिन्याला खर्च होतो. तर सेवानिवृत्त 1600 कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्ती वेतनावर 2 कोटी रूपये खर्च येतो. सातव्या वेतनामुळे आता कार्यरत कर्मचार्‍यांच्या वेतनात 1 कोटी 30 लाख रूपये तर सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी 70 लाख रूपये अतिरीक्त खर्च होईल. अर्थात पालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला दोन कोटींचा भार वाढणार आहे.

पगारात 15 टक्के वाढ होणार

वर्ग 1 : कर्मचार्‍याला 50 हजार पगार असेल तर आता सात ते आठ हजार वाढ होईल.

वर्ग 2 : कर्मचार्‍याला 40 हजार पगार असल्यास आता 5 ते 6 हजार रूपये वाढ होईल.

वर्ग 3 : कर्मचार्‍याला 30 हजार पगार असल्यास आता 4 ते 5 हजार रुपयांची वाढ होईल.

वर्ग 4 : कर्मचार्‍याला 20 हजार पगार असल्यास अडीच ते तीन हजार वाढ होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button