क्रिकेट निवड चाचणीत 70 खेळाडूंचा सहभाग
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने परभणी येथे 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. याकरीता नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा संघाची निवड चाचणी घेण्यात आली. जिल्हाभरातील 70 खेळाडूंनी सहभाग घेतला. दोन दिवसीय शिबिरानंतर अंतिम संघाची निवड होणार आहे.
परभणी येथे होणार्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हाभरातील खेळाडूंनी नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर घाम गाळत उत्कृष्ट प्रदर्शन केले. तीन तास चाललेल्या या निवड चाचणीत खेळाडूंनी गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आदी गुणांचे कौशल्य दाखवले. नऊ वर्षापासून पुढे विविध वयोगटाच्या खेळाडूंनी यात सहभाग घेतला.
परभणी येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार असून राष्ट्रीय स्पर्धा जम्मू कश्मीरात होत आहेत. स्पर्धेसाठी ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नीना कटलर, प्रा.आनंद उपाध्याय, गोपाल जोनवाल, अकबर खान, नरेंद्र मस्के यांचे सहकार्य लाभले. सिलेक्टर म्हणून कुलदीप कोळी, ए.आर.पटेल, हस्नैन बागवान यांनी काम बघितले. दोन दिवसीय शिबिरानंतर अंतिम संघ निवडला जाणारा असल्याची माहिती जिल्हा सचिव वासेफ पटेल यांनी दिली.