⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगावच्या ‘सिका’ ब्रँडची हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ‘स्मॅक’चे लॉंचिंग

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील तरुण उद्योजक श्रीराम पाटील यांच्या सिका इ मोटर्सच्या स्मॅक या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचा भव्य लॉन्चिंग सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, सन्मानचिन्ह व रोपटे देऊन करण्यात आले. तदनंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम पाटील यांनी प्रास्ताविक करताना, स्मॅक या स्कूटरबद्दल अधिक माहिती दिली. गेल्या ३३ वर्षांपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात यशस्वीरीत्या सेवा देऊन उत्कृष्ठ सेवा देणे हेच कर्तव्य मानून वाटचाल करीत आलेलो आहोत. त्यासोबतच खानदेशातल्या प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून स्वतःपासून सुरुवात करून आपला परिसर प्रदूषण मुक्त करण्याचे आवाहन केले. ग्राहक सेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य घेऊन जास्त ग्राहक न बनवता ग्राहकांसोबत जास्तीत जास्त नाते मजबूत व्हावे यावर आम्ही जास्त भर देतो असे प्रतिपादन श्रीराम पाटील यांनी केले.

स्मॅक या स्कूटर बद्दल सांगतांना त्यांनी सांगितले कि, हि स्कूटर आरटीओ पासिंग प्रकारातील असून यात ६० व्होल्टची दमदार लिथियम आयन बॅटरीचा समावेश केलेला आहे. या बॅटरीमुळे सदरील स्कूटर प्रति चार्ज १०० किलोमीटर चालेल असा कंपनीचा दावा आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल डिस्प्ले, ‘रिजनरेटिव्ह कंट्रोलर, टेलिस्कोपिक सस्पेंशन, अँटीथेफ्ट अलार्म सिस्टिम, रिव्हर्स गियर, साईड स्टॅन्ड सेन्सर, ट्युबलेस टायर्स तसेच यूएसबी चार्जर यासारख्या विविध सुविधा उपलब्ध असून सदर स्कूटर ७ विविध रंगात उपलब्ध आहे.

वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत यासाठी इलेक्ट्रिक वाहन किती आवश्यक आहे याची गरज बघता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्याच क्षणी २५ स्कूटर खरेदी करण्याचे आश्वासन देऊन बुकिंग केले. तसेच सर्जना मीडियाचे संचालक रवींद्र लड्ढा यांनी ५ स्कूटरचे व लक्ष्मी केमिकलचे डायरेक्टर सी.जे.सूर्यवंशी यांनी १ स्कूटर त्याचक्षणी बुक केली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सातपुडा ऑटोचे संचालक डी.डी.बच्छाव, बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मॅनेजर रश्मिरेखा पती, चिन्मय क्रिटिकल केअर सेंटरचे डॉ.राहुल महाजन, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे व्हाईस प्रेसिडेंट युसूफ मकरा, जळगाव जिल्हा मेडिकल डीलर्स असोसिएशनचे प्रेसिडेंट सुनील भंगाळे, सर्जना मीडिया सोल्युशनचे अध्यक्ष रवींद्र लड्ढा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पगारिया ऑटोचे संचालक पुखराज पगारिया होते. खान्देशातील जळगाव सारख्या ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन होणे ही सर्व खानदेश वासियांना अभिमानाची बाब आहे. तरुणांनी श्रीराम पाटील यांचा आदर्श घेऊन नोकरीची कास न धरता व्यवसायाभिमुख व्हावे, तसेच छोटा का असेना पण व्यवसाय उभारून गरजूंना रोजगार उपलब्ध करून द्यावा. असे वक्तव्य अध्यक्षीय भाषणात पुखराज पगारिया यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे किती हितावह व पर्यावरण पूरक आहे याची विस्तृत माहिती दिली. कार्यक्रम समाप्तीवेळी अनेक हितचिंतकांनी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.