जळगाव लाईव्ह न्युज । ९ एप्रिल २०२२ । धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात ६८ प्रशिक्षणार्थी पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना तात्काळ रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अधिक असे की, नव्याने पोलीस दलात येणाऱ्या पोलीस विद्यार्थ्यांना धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जात असते. तसेच त्यांच्या निवासासह जेवणाची सोयदेखील याच ठिकाणी करण्यात येते. दुपार आणि रात्रीचे जेवण त्यांना वेळेवर दिले जाते. काल रात्रीचे जेवणानंतर सुरुवातीचा काही वेळ कुणाला काही त्रास जाणवला नाही पण, क्षणार्धात एका पाठोपाठ एक याप्रमाणे जेवण केलेल्या ६८ प्रशिक्षणार्थींना मळमळ सुरू झाली आणि उलट्या होऊ लागल्या. ही बाब गांभीर्याने लक्षात घेत त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
त्यांना जेवणातून किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून दिली जात आहे.