⁠ 
सोमवार, जून 17, 2024

मुंबई-नागपूर अवघ्या ७ तासात; ५५ हजार कोटींचा असा आहे समृद्धी महामार्ग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १० डिसेंबर २०२२ | मुंबई ते नागपूर असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी होत आहे. या मार्गावरुन मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या सात ते आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होईल. यामुळे या जिल्ह्यांच्या विकासाला पंख लाभणार आहेत.

७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक ८३११ हेक्टर जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया अवद्या आठ महिन्यात पार पडली. या द्रुतगती मार्गावरून १०० कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर नागपूरहून मुंबईपर्यंत यायला अवघे सहा ते आठ तास लागतील. या महामार्गावर २४ इंटरवेज, ७०० अंडरपासेस, ६५ उड्डाणपूल, २९४ लहान पूल, ३२ वे साईड अमॅनेटीझ व ८ रेल्वे ओव्हरब्रीज आहेत. द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा सुमारे १२ लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहे. तसेच १८ कृषी समृद्धी केंद्रे उभरण्यात आली आहेत. या महामार्गासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

पूर्णपणे ग्रीनफिल्ड असलेला समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणी राज्य वा राष्ट्रीय महामार्गाला छेदून जाईल, त्या ठिकाणी इंटरचेंजेस तयार केले जाणार आहेत. असे एकूण २४ इंटरचेंजेस समृद्धी महामार्गावर असतील. या २४ पैकी १८ इंटरचेंजेस नजीक कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केली जाणार आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर विकसित केले जाणारे प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र स्वयंपूर्ण नवनगर असेल. या नवनगरांमध्ये शेतीला पूरक उद्योग असतील. औरंगाबाद जिल्ह्यातील जांबरगाव, बुलडाणा जिल्ह्यातील सावरगाव माळ आणि वर्धा जिल्ह्यातील रेणकापूर येथे गोदामे उभारली जाणार असून त्यात शेतमाल साठवणुकीला चालना देण्यात येणार आहे. वन्यजीव आणि पर्यावरणाचे रक्षण महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर तब्बल साडेबारा लाख झाडांची लागवड केली जाणार आहे.

समृद्धी महामार्ग ३९२ गावांना जोडणार आहे. यामुळे या गावांचा विकास हाताच्या अंतरावर येवून ठेपला आहे. ग्रामस्थांच्या सोईसाठी ७०० अंडरपासेस उभारण्यात आले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तसेच या महामार्गाच्या दोन्ही बाजूला तीन मीटर उंचीची भिंतही बांधली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही अनाहूत वाहने, प्राणी या महामार्गावर येऊ शकणार नाहीत व महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त राहील. याशिवाय वन्यजीवांना त्यांच्या अधिवासात समृद्धी महामार्ग अडथळा ठरू नये यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशा अंडरपास आणि ओव्हरपासची उभारणी करण्यात आली आहे. वन्यजीवांचा वावर ज्या परिसरात असेल त्या परिसराला अनुरूप अशीच या अंडरपास वा ओव्हरपासची रचना केलेली आहे.