जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात अवैध गॅस सिलिंडरचे अनेक काळेबाजार समोर येत आहे. याच दरम्यान आता जळगावातील रामेश्वर कॉलनीत राजपूत गल्लीत मजुराच्या घरातून एमआयडीसी पोलिसांना तब्बल ५४ गॅस सिलिंडर जप्त केले आहे. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

पोलिस कॉन्स्टेबल योगेश घुगे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी रामेश्वर कॉलनीतील राजपूत गल्लीत राहणारा किरण भागवत पाटील (वय ५१, रा. घर नंबर ३५) यांच्या घराची तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या गॅस कंपनीचे घरगुती वापराचे तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडर व रिफिलिंगसाठी लागणारे साहित्य असा १,६४,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिस पथकाने जप्त केला आहे.
असा साठा घरातून केला जप्त
भारत गॅसचे २४ भरलेले व्यावसायिक सिलिंडर, १९ भरलेले घरगुती सिलिंडर, २ रिकामे व्यावसायिक सिलिंडर. एचपीचे २ भरलेले व एक रिकामे घरगुती सिलिंडर. इतर सहा भरलेले सिलिंडर, इलेक्ट्रॉनिक प्रेशर मोटर व त्याला जोडलेले दोन प्लास्टिक पाइप, नळीच्या टोकाला गॅस हंडीला जोडणारे लोखंडी सॉकेट. एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त केला.