50 हजारांची लाची भोवली : महापालिकेच्या शिक्षणाधिकार्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । नाशिक एसीबीची धूरा पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांभाळल्यानंतर बड्या-बड्या अधिकार्यांवर कारवाईचा सपाटा सुरू झाल्याने लाचखोर पुरते हादरले आहेत. नाशिक मनपाच्या शिक्षणाधिकार्यांसह लिपिकाला आता लाच प्रकरणात अटक करण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण संस्थेवर कारवाई करण्यासाठी मुख्याध्यापकाकडून पन्नास हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना महालिकेतील शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (57, रा.801 रचित सनशाईन, उंटवाडी नाशिक (वर्ग-2) तसेच शिक्षण विभागातीलच लिपिक नितीन जोशी (45, रा. फ्लॅट नंबर 8, पुष्पांकुर अपार्टमेंट, चव्हाण नगर, तपोवन, नाशिक (वर्ग -3) यास पाच हजारांची लाच घेताना अटक करण्यात आल्याने लाचखोर हादरले आहेत.
कारवाई करण्यासाठी मागितली लाच
तक्रारदार हे खाजगी शैक्षणिक संस्थेत नाशिकमधील मुख्याध्यापकपदावर कार्यरत होते मात्र त्याना संस्थेने गैरवर्तनाचा ठपका ठेवत मुख्याध्यापक पदावरून बडतर्फ केले. या बडतर्फी विरोधात मुख्याध्यापक शैक्षणिक न्यायाधीकरणाकडे दाद मागितली होती. त्यानुसार त्यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्यात आली होती. या संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने शिक्षणाधिकार्यांकडे अर्ज केला परंतु त्यावर पत्र देण्यासाठी मुख्याधापकाकडे 50 हजारांची मागणी करण्यात आली. त्यानुसार मुख्याध्यापकाने एसीबीकडे तक्रार केली. शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास धनगर यांच्या कार्यालयातच सापळा रचला. तक्रारदाराकडून धनगर यांनी 50 हजारांची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली व धनगर यांच्या कार्यालयातील वरीष्ठ लिपिक नितीन जोशी याने हे पत्र बनवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच घेतल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस निरीक्षक संदीप घुगे, निरीक्षक गायत्री जाधव यांच्यासह कर्मचारी एकनाथ बाविस्कर,प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी हा सापळा यशस्वी केला.