जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या सरपंचांना थांबण्यासाठी जिल्हास्तरावर सरपंच भवन उभारण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियाेजन समितीतून ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घाेषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
सरपंच परिषदेतर्फे औद्योगिक वसाहतीमधील लॉन्सवर रविवारी जिल्हा सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पाेपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे हाेत्या. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील, आ.शिरीष चाैधरी, आ.मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, माजी आ.स्मिता वाघ, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय काकडे, सरचिटणीस ऍड.विकास जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर साेनवणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खाेडपे यांची उपस्थिती हाेती.
खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्हास्तरावर सरपंच भवनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर बाेलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरपंच भवनासाठी नियाेजन समितीमधून ५० लाख रुपये देण्याची घाेषणा केली. गावाच्या विकासाची दिशा सरपंचांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. पद मिळाल्यानंतर सरपंचांनी जमिनीवर राहून कामे केली पाहिजे. हे पद विराेधकांचा बदला घेण्यासाठी नाही. चांगले काम केले तरच राजकारणात यशस्वी हाेता येते हे सूत्र लक्षात ठेवा, असे पालकमंत्री म्हणाले.
शासनाने निर्णय न घेतल्यास ग्रामपंचायती बंद
सरपंचांचे मानधन वाढवण्यासह ग्रामपंचायतीशी संबंधित मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचाती एक दिवस बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय काकडे यांनी दिला. सरपंचांना जिल्हा नियाेजन समितीवर प्रतिनिधित्व देवून मानधन वाढविले पाहीजे. पॅनलबंदीचा कायदा लागू केला पाहीजे. विधान परिषदेवर सरपंचांच्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व मिळण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
गिरीश महाजनांच्या नावे घोषणा आणि सूत्रसंचालकाला थांबविले
सूत्रसंचालन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याने आ.गिरीश महाजन यांच्या सहा टर्मनंतर पुढील वेळीही आ.महाजन हेच निवडून येणार असल्याचा दावा केला. सरपंच परिषद ही काेणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे वारंवार सांगितले जात असताना परिषदेला भाजपचा रंग देण्याचा प्रयत्न हाेत असल्याचा आरोप करीत काही सरपंचांनी सुत्रसंचालकाला थांबवले.
पालकमंत्र्यांनी दिली वेळेची आठवण
नियाेजित सरपंच परिषदेला दुपारी १२ वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील हे वेळेवर पाेहचले. परंतु, कार्यक्रम सुरू नसल्याने ते परत निघून गेले हाेते. कार्यक्रम दुपारी दीड वाजेला सुरू झाल्यानंतर ते पुन्हा आले. अन्य पदाधिकारी मात्र कार्यक्रम संपेपर्यंत येणे सुरूच हाेते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरपंचांना संबाेधित करताना राजकारणात वेळ पाळायला शिका, तसा संकल्प करा. लाेकांच्या वेळेचा सन्मान केला तर यशस्वी व्हाल असा कानमंत्र दिला.