जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व्हावे म्हणुन खान्देश आणि मराठवाडा या भौगोलिक क्षेत्रात कार्यरत चित्रसाधकांचे एकत्रिकरण आणि भारतीय विचारांचे मुल्यसंवर्धन व्हावे या उद्देशाने डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १५ व १६ जानेवारी २०२२ रोजी स्वर्णतीर्थ जळगाव नगरी येथे देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.
खान्देश व मराठवाडा या भौगोलिक व चित्रपट क्षेत्रात कार्यरत अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय येथे आयोजित करीत आहोत. अश्या स्वरुपाचा मोठा फिल्म फेस्टिवल जळगावात प्रथमच संपन्न होत आहे. या फेस्टिवलमध्ये खान्देश व मराठवाडा परिक्षेत्रातुन लघुपट, डॉक्युमेंट्री, कॅम्पस फिल्म, अॅनिमेशन फिल्म या चार विभागात चित्रपट मागविले गेले असले तरीही उर्वरित महाराष्ट्रातून देखील चित्रपट या महोत्सवात आले आहेत.
जळगावमध्ये प्रथमच होत असलेल्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ६० चित्रपट आले आहेत यापैकी परीक्षांनी निवडलेल्या उत्तम ५० लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन दिनांक १५ व १६ जानेवारी दरम्यान विविध दालनांमध्ये केले जाणार आहे. या महोत्सवासाठी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्रांगणास स्व. स्मिता पाटील चित्रपट नगरी असे नाव देण्यात आले असून मुख्य दालनास चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके दालन तर उर्वरित तीन दालनांना अनुक्रमे व्ही. शांताराम दालन, स्व. रंजना देशमुख दालन व स्व. निळू फुले दालन अशी नावे देण्यात आली आहेत.
सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रा. श्री. योगेश सोमण व मोहेंजोदाडो सारख्या चित्रपटांचे पटकथा लेखक, आयफाचे ज्युरी व सुप्रसिद्ध दिग्दर्शक आकाशादित्य लामा हे या दोन दिवसीय महोत्सवात पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात स्थानिक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक इत्यादींसाठी श्री योगेश सोमण व आकाशादित्य लामा यांच्या कार्यशाळा होणार आहेत. या महोत्सवाची सुरुवात १५ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता विविध दालनांमध्ये काही चित्रपटांच्या प्रदर्शनाने होणार आहे.