⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | आरोग्य | धक्कादायक : विद्यापीठ वसतिगृहातील ४०० विद्यार्थीनींना मिळते कच्चे व निकृष्ठ जेवण?

धक्कादायक : विद्यापीठ वसतिगृहातील ४०० विद्यार्थीनींना मिळते कच्चे व निकृष्ठ जेवण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ३० ऑगस्ट २०२३ | आदिवासी आश्रम शाळा किंवा अंगणवाड्यांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना निकृष्ठ पोषण आहार दिला जात असल्याच्या तक्रारी नेहमीच होत असतात. मात्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वसतीगृहात राहत पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे ४०० विद्यार्थीनींना कच्चे-पक्के व निकृष्ठ जेवण दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे ४०० विद्यार्थीनींच्या स्वाक्षरी असणाऱ्या निवेदनाव्दारे कुलसचिवांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

विद्यापीठाच्या आवारात असलेल्या फेज क्रमांक एक आणि एपीजे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनींचा खानावळीचा ठेका एकाच व्यक्तीकडे देण्यात आला आहे. एका वसतिगृहात २०० तर दुसऱ्या वसतिगृहात २०० अशा एकूण ४०० विद्यार्थिनी या ठिकाणी दररोज जेवण करतात. यासाठी महिन्याला १२०० रुपये घेतले जातात. मात्र तरीही निकृष्ठ जेवण दिले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

खानावळीत भातासाठी वापरला जाणारा तांदूळ योग्य धुतला जात नाही. सकाळच्या जेवणात एक भाजी, पोळी, वरण-भात व सलाद देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात फक्त भाजी, पोळी, वरण-भात मिळतो. तो देखील कच्चा असतो. सलाड आजपर्यंत कधीही देण्यात आले नाही. सायंकाळी देण्यात येणारा भात, खिचडी ही कच्ची असते. त्यामुळे अनेकदा आम्हाला न जेवताच झोपून जावे लागत असल्याचे विद्यार्थिनींकडून सांगण्यात आले.

मुलींच्या वसतीगृहातील जेवणामुळे विद्यार्थिनींना पोटाचे विकार जडण्याच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. बाहेरील जेवणाची परवानगी नसल्याने त्यांना उपाशीपोटी झोपावे लागते आहे. कच्चे-पक्के जेवण मिळत असल्याने विद्यार्थीनींनी या खानावळीचा ठेका बदलवून मिळावा अशी मागणी केली. कुलसचिव विनोद पाटील यांना मंगळवारी ४०० विद्यार्थिनींच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले.

विद्यार्थिनींनी निकृष्ट जेवणाबाबत ‘मासू’ या संघटनेकडे कैफीयत मांडली. त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थिनी यांनी मंगळवारी विद्यापीठातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. खानावळीचा ठेका रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली. मासूचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, धरती चौधरी, पृथ्वी पाटील, करण शिंदे, शुभम सोनवणे उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह