जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । लाेहारा ( ता.पाचोरा ) येथे गेल्या काही दिवसांपासून बांबरुड (राणीचे) जंगलातून भल्या पहाटे ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी ३० रोजी पहाटे ५ वाजताच सापळा रचून लोहारा गावाजवळ अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर पकडले. ही कामगिरी ४ जणांच्या टीमने केली.
हे ट्रॅक्टर पकडून लोहारा पोलिस दूरक्षेत्र कार्यालयात आणले आहेत. मात्र, यावेळी लोहारा पोलिस दुरक्षेत्र बंद होते तर तेथे एकही पोलिस कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे हे ट्रॅक्टर पाचोरा तहसील कार्यालयात नेण्यात आले. दरम्यान, या कारवाईमुळे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या आदेशानुसार व तहसीलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनात आणि नायब तहसीलदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा मंडळ अधिकारी वरद वाडेकर, कुरंगी-सामनेरचे तलाठी दीपक दवंगे, दहिगाव-माहिजीचे तलाठी कैलास बहिर, लासगाव येथील तलाठी सुनील राजपूत यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी करुन ४ ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत. या कारवाईचे परिसरात स्वागत केले जात आहे.
हे देखील वाचा :
- रेशन कार्डांबाबत मोठी अपडेट; वाचा अन्यथा रद्द होवू शकते तुमचे रेशनकार्ड
- शरद पवार, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पाचोऱ्यात प्रतिउत्तर देणार का ?
- धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे यावल तालुक्यात महिलेचा मृत्यू
- सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली? ; आमदारांनी फोनवर एकविले डिलिंग
- एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा 26 ऑगस्टला पाचोऱ्यात