जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू वाहतूक करणार्या डंपरावर कारवाई न करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच स्वीकारताच लाच जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी एक वाजता पोलिस ठाण्यातच अटक केली. आरोपींना शुक्रवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता दोघा आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

डंपरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
साकेगाव येथील 30 वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर (क्रं.एम.एच.40 एन. 4086) असून वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्या द्वारे वाळू वाहतूक केली जाते मात्र या वाहनावर कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ वाणी (56, रा.भिरूड कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) व कॉन्स्टेबल गणेश महादेव शेळके (31, पोलीस वसाहत, वरणगाव ता.भुसावळ) यांनी दहा हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. शेळके यांनी तक्रारदाराकडून पोलीस ठाण्यात लाच स्वीकारताच आधी शेळके व नंतर वाणी यांना अटक करण्यात आली.
वाणीच्या घरात सापडले घबाड
गुरुवारी एसीबीने ट्रॅप केल्यानंतर संशयीत आरोपी तथा उपनिरीक्षक वाणी यांच्या भुसावळातील घराची झडती घेतली असता त्यात सुमारे चार लाखांवर रोकड आढळल्याने ती पथकाने जप्त करण्यात आली. या संदर्भात चौकशी सुरू असल्याने अधिक सांगता येणार नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.’