⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

जिल्हा पोलीस दलास १५ चारचाकींसह ३८ दुचाकी सुपूर्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । कोरोना काळात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अनेक पोलीस कर्मचारी बाधित झाले तर काही मृत्यूमुखी पडले. मात्र त्यानंतरही पोलीस दलाने २४ तास सेवा बजावली. त्याचीच फलश्रुती म्हणून जळगाव जिल्हा कोरोनामुक्त होत आहे. शासनाने नागरिकांच्या तक्रार निरसनासाठी ११२ ही प्रणाली कार्यान्वित केल्याने तक्रारीचे वेळीच निरसन व्हावे यासाठी वाहनांची आवश्यकता होती. तक्रार निरसनासाठी या वाहनांमुळे पोलीस कर्मचार्‍यांना तत्काळ घटनास्थळी पोहचता येणार असून पोलीस दलाच्या वाहनांचा बर्‍यापैकी प्रश्‍न सुटला आहे. यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेही सहकार्य लाभले असून या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलाचे मनोबल उंचावणार असून अधिक सक्षम होण्यास मदत होईल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

आपले पोलीस संकल्पनेच्या अंतर्गत दुसर्‍या टप्प्यात आज पोलीस मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १५ चारचाकी आणि ३८ दुचाकी वाहने जळगाव जिल्हा पोलीस दलाला सुपर्द करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १४ बोलेरो मिळाल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात १५ चारचाकी अशा आता एकूण २९ चारचाकी व ३८ दुचाकी पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नगरसेवक अमर जैन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाहनाला नारळ वाढवून तसेच पूजन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सर्व चारचाकी व दुचाकी वाहने पथसंचलनासाठी शहरात मार्गस्थ झाली. कोर्ट चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफुली मार्गे स्वातंत्र्य चौक व पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात संबंधित वाहने पथसंचलनानंतर दाखल झाली. पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. पोलिस दलात असलेली वाहने कालबाह्य झाल्याने तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिक पैसा खर्च होत असल्याने पोलिस दलाकडून जिल्हा नियोजन समितीकडे वाहनांसाठी पोलिस अधीक्षकांनी प्रस्ताव सादर केला होता. पालकमंत्र्यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करून २३ जानेवारी २०२१ रोजी  २ कोटी ३२ लाख ४१ हजार ७१ रूपयांची तरतूद केली होती. कोविडच्या आपत्तीमुळे हा निधी एकदा देण्यात आला नसून याचे दोन टप्पे करण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यासाठी  ९९ लाख ३२ हजार रूपयांच्या वाहने खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. यातून जिल्हा पोलीस दलास १४ बोलेरो वाहने प्रदान करण्यात आली होती.  आता दुसर्‍या टप्प्यासाठी उर्वरित १ कोटी ३३ लाख रूपयांचा निधी जिल्हा पोलीस दलाकडे वितरीत करण्यात आला होता. यातून महेंद्रा बोलेरो बी-४ बीएसव्हीआय या मॉडेलची १५ वाहने आणि ३८ होंडा शाईन दुचाकी गाड्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते जिल्हा पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली असून या वाहनांमुळे पोलीस दलाला मोठी मदत होणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले.

 

पोलीस मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरिक्षक समीर मोहिते यांनी कार्यक्रमाचे नियोेजन केले. सूत्रसंचालन पोलीस नाईक अमित माळी यांनी तर आभारप्रदर्शन पोलीस गृह विभागाचे उपअधीक्षक भास्करराव डेरे यांनी केेले.