मंत्री गुलाबराव पाटीलांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथील 30 कोटींची ऐतिहासिक योजना पूर्णत्वास”
जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी वासियांना दिलेले वचन पाळत पाळधी येथे 30 कोटी रुपयांच्या सोलर पाणीपुरवठा योजनेचा यशस्वी अमल केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह या ऐतिहासिक योजनेचे संपूर्ण पाहणी करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण झालेल्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणे हे माझ्यासाठी आद्य कर्तव्य आहे. “राज्यातील प्रत्येक गावातील पाणीटंचाई मिटवणे हीच खरी सेवा आहे. यापुढेही जनतेच्या विकासासाठीच काम करणार असून तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून मला संधी मिळाली आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील प्रलंबित आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी मिशन मोडवर काम करणार असल्याचे सांगत लवकरच राज्यभर दौरा करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते.
म.जी. प्रा. चे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ही सोलरवर आधारित पहिली योजना असून, 30 कोटींच्या निधीतून ती पूर्ण झाली आहे. या योजनेअंतर्गत फिल्टर प्लांटमध्ये दिवसाला 40 लाख लिटर पाणी शुद्ध केले जात असून, 4 हजार 800 नळ जोडण्याची सुविधा गावांना उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार सरपंच विजय पाटील यांनी मानले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक करत सांगितले की, “महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे पुण्य कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे त्यांना ‘राज्याचे वाटर मॅन’ म्हणून ओळख मिळाली आहे.”