⁠ 
सोमवार, मार्च 4, 2024

३० ब्रास वाळूचा साठा महसूल प्रशासनाद्वारे जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत अवैधरित्या वाळूचा साठा शनिवारी १९ ऑगस्ट रोजी पहाटे महूसल पथकाला आढळून आला. महसूल पथकाने वाळूचा साठा जप्त केला असून एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने शनिवारी १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता धडक मोहिम राबवित अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर वाळू साठा करणाऱ्यांवर देखील कारवाई केली. दरम्यान, गिरणा नदीच्या काठावर असलेल्या बांभोरी गावातील मोकळ्या जागेत शनिवारी १९ ऑगस्ट रोजी पहाटे दोन ठिकाणी ९६ हजार रूपये किंमतीचे एकुण ३० ब्रास वाळूचा साठा महसूल प्रशासनाला आढळून आला.

गिरणा नदीतून वाळूची चोरटी वाहतूक करून वाळूचा साठा जमा केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बांभोरी येथील तलाठी गजानन देविदास बिंदवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिमराव जंगलू नन्नवरे रा. बांभोरी ता.धरणगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल पथकाने वाळूचा साठा जप्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.