⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पोलिसांची ढेरी कमी करण्यासाठी २५० रुपये! वाचा काय आहे ही भानगड

जळगाव लाईव्ह न्यूज : १५ मार्च २०२३ : ढेरी सुटलेल्या पोलिसांवरुन मीडियात नेहमीच जोक्स व मिम्स्चा पाऊस पडत असतो. पोट सुटणे ही पोलिसांपुढे मोठी समस्या आहे. ढेरपोटे झाल्यानंतर या पोलिसांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. एखाद्या ढेरी सुटलेल्या पोलिसाच्या समोरून चोर किंवा आरोपी पळत असला तरी त्या चोराला पोलीस पकडू शकत नाही. ढेरी सुटलेल्या पोलिसांपेक्षा आरोपीच सुसाट पळतात. त्यामुळे पोलिसांना पोट कमी करणे आवश्यक आहे. या विषयाची हि पहिली बाजू आपणा सर्वांना माहित आहे. मात्र याची दुसरी बाजूही समजून घेण्याची आवश्यकता आहे.

गुन्हेगारांचा पाठलाग, बंदोबस्त, गस्त, दंगल काबू आणणे, आपत्कालीन प्रसंगी होणारी धावाधाव यासाठी फिटनेस पोलिसांसाठी सर्वात आवश्यक असते. मात्र, अनेक पोलिस कर्मचारी याबाबीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी त्यांचा स्थुलपणा वाढत जाऊन ते ढेरपोटे होते. या ढेरपोटे पोलिसांकडून पोलिस दलाला साजेसे काम होत नाही. नाईलाजाने अधिकार्‍यांना यांना बैठे काम द्यावे लागते. गस्त आणि बंदोबस्त यात सतत व्यस्त राहणार्‍या पोलिसांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जेवणाची किंवा झोपण्याची वेळ नाही, वेळ मिळेल तशी दिनचर्या व कामे पोलिसांना करावीच लागतात. सतत कामाचा ताण त्यांच्यावर राहात असल्याने आणि जेवणाची वेळ निश्चित नसल्याने बहुतांश पोलिसांचे पोट सुटते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बहुतांश पोलिसांचे पोट सुटले असून, मधुमेह व उच्चरक्तदाब यासारखे आजार घेऊनही पोलिसांना २४ तास कर्तव्य बजावावे लागते. चोरी, दरोडे व अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणे, सण, उत्सव, मेळावे, नेत्यांचे दौरे, मोर्चे, आंदोलने, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे आदि कामे त्यांना करावी लागतात. कामाच्या नादात जेवणाकडे दुर्लक्ष होते. जेवणाकडे कानाडोळा झाला तर त्याचा विपरीत परिणाम शरिरावर होतो. वेळी-अवेळी जेवण, बंदोबस्ताच्या काळात मिळेल ते खाणे यामुळे पोलिसांचे पोट सुटत आहे. (दारु पिणार्‍या पोलिसांच्या बाबतीत अन्य कारणे आहेत.)

नोकरी करताना फिटनेस प्रमाणपत्र पोलिसांना द्यावे लागते. आधी खासगी डॉक्टरांचेही फिटनेस प्रमाणपत्र चालत होते. परंतु, आता हे प्रमाणपत्र सरकारी डॉक्टरांचेच घ्यावे लागते. तंदुरुस्त राहण्यासाठी पोलिसांना दर महिन्याला फिटनेस भत्ता दिला जातो. मात्र दर महिन्यात २५० रुपयात फिट कसे राहता येईल? हा मुख्य प्रश्‍न आहे. यातही हा भत्ता मिळविण्यासाठी पोलिसांना काही कागदपत्रे सबमिट करावी लागतात. त्यानंतर वजन, उंची तपासणी करुन पात्र पोलीस कर्मचार्‍यांना फिटनेस भत्ता दिला जातो. आता तुम्हीच सांगा वाढत्या महागाईच्या काळात केवळ २५० रुपयात फिटनेस कसा सांभाळता येईल? याचाही विचार शासनाने करण्याची आवश्यकता आहे.