पोटातील अडीच किलोची गाठ काढून शस्त्रक्रियेद्वारे महिलेला जीवनदान

 

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । शहरातील चाळीस वर्षीय महिलेला गर्भाशयातील गाठीमुळे जीव धोक्यात आल्याने अनेक रुग्णालयात उपचार नाकारण्यात आले. मात्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिलेला दाखल करून घेत शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातील सुमारे अडीच किलोची गाठ काढण्यात वैद्यकीय पथकाला यश आले.

शहरातील चाळीस वर्षीय महिला सुरेखा मिस्त्री यांना पोटामध्ये दुखत असल्या कारणाने व पाळीच्या दरम्यान अतिरक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. अनेक खाजगी रुग्णालयांनी महिलेची परिस्थिती पाहून तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर महिलेच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामध्ये २० सप्टेंबर रोजी दाखल केले.

यावेळी विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेची तपासणी केली. पोटात गर्भाशयाला मोठी गाठ होती. सर्व तपासण्या व सोनोग्राफी केल्यानंतर असे आढळून आले की, गर्भाशय मधील गाठ अडीच किलोची आहे. महिलेवर तातडीने २१ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करून ही अडीच किलोची गाठ काढण्यात आली. आज शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी महिलेची प्रकृती स्थिर असून तिचा जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. शितल ताटे, डॉ. कोमल तुपसागर, डॉ. चंदन महाजन, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. राजश्री येसगे, डॉ. विनेश पावरा, यांच्यासह भूलतज्ञ डॉ. संदिप पटेल,डॉ. काजल साळुंके,डॉ. स्वप्नील इंकणे , शस्त्रक्रिया गृहातील परिचारिका नीला जोशी, परिचारिका कीर्ती तळेले व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज