⁠ 
शनिवार, मे 11, 2024

उमरा, राजुऱ्यात दोन दिवसात दगावली १४ गुरे; कारण अस्पष्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील उमरा व राजुरा या गावात दोन दिवसात दहा शेळया, ३ गायी व १ गोऱ्हा दगावल्याची घटना घडली आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेले लसीकरण व वेळीच उपचार न मिळाल्यामुळे ही जनावरे दगावल्याचा आरोप पशुपालकांकडून केला जात आहे तर विषबाधेमुळे या जनावरांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पशुसंवर्धन विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील भरत भोलाणकर यांच्या मालकीच्या शेळ्या अचानक आजारी पडल्याने यात दहा शेळ्या दगावल्या असून कुऱ्हा पशुवैद्यकीय दवाखान्यातुन वेळेवर उपचार न मिळाल्याने बकऱ्या दगावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उमरा येथेही संतोष रसाल राठोड, पवन रघुनाथ राठोड व पुरा मखराम चव्हाण यांच्या तीन गायी व तुकाराम सुकदेव राठोड यांचा एक गोऱ्हा अशी ४ जनावरे दगावली आहेत तर काही जनावरांची प्रकृती बिकट असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसात १४ जनावरे दगावल्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लसीकरणामुळे गुरे दगावल्याचा आरोप
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. डुघ्रेकर यांच्या पथकाने राजुरा व उमरा येथे भेटी देऊन पाहणी केली‌. राजुरा येथील एक बकरी व उमरा येथील एका मृत गोऱ्हाचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपुर्वी पशुसंवर्धन विभागामार्फत या दोन्ही गावात लसीकरण करण्यात आले होते, यामुळे व वेळेवर उपचार न मिळाल्याने ही गुरे दगावल्याचा आरोप पशुपालकांकडून केला जात आहे. तर ही गुरे लसीकरणामुळे नाही तर काही तरी विषबाधेमुळे दगावली असल्याचा संशय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.डुघ्रेकर यांनी व्यक्त केला.

मदतनीस पार पडतोय डॉक्टरांची जबाबदारी
कुऱ्हा येथे वर्ग एकचा पशु दवाखाना आहे. मात्र येथील पशुसंवर्धन अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे येथील मदतनीस भगवान पाटील हे सर्व कारभार पहात आहेत. जनावरांना औषधोपचार करणे, शासकिय योजना राबविणे, प्रशासकिय कामे अशी सर्वी कामे ते करीत असल्याने पशुपालकांमध्ये कमालीची नाराजी आहे. मदतनीस व्यक्तीने डॉक्टरांची जबाबदारी सांभाळणे म्हणजे मुक्या पशुंच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याची ओरड पशुपालक करीत आहे.

संपुर्ण तालुक्यात लसीकरण
पशुंचे आरोग्यहित लक्षात घेता पंचायत समिती सभापती विकास पाटील यांच्या संकल्पनेतून पशुसंवर्धन विभागामार्फत संपुर्ण तालुक्यात पशुसंवर्धन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. २० दिवसांत आतापर्यत तब्बल ६० गावांत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहीमेला पशुपालकांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभला आहे, त्यामुळे असंख्य पशुंचे लसीकरण झाले आहे. अधिकाधिक पशुपालकांनी आपापल्या पशुंचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सभापती विकास पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे.

जनावरांचे मृत्यू विषबाधेमुळे
तालुक्यासाठी मी एकच डाॅक्टर आहे, त्यामुळे लसीकरणासाठी काही खाजगी पशु डॉक्टर नेमलेले आहेत. तालुक्यातील सुमारे ६० गावांतील पशुंचे लसीकरण झाले आहे. मात्र त्याठिकाणी असे काही घडले नाही, त्यामुळे राजुरा व उमरा येथील जनावरांचे मृत्यू विषबाधेमुळे झाले असण्याची शक्यता आहे.
– डॉ. डुघ्रेकर, तालुका पशुधन अधिकारी, मुक्ताईनगर