जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । शहरात पोलिसांकडून चौकाचौकात सुरू असलेल्या नाकाबंदीचा फटका बेड मॅनेजमेंट सिस्टीमच्या डॉक्टरला देखील बसला असून त्यांना थेट १७०० रुपयांचा मेमो बजावण्यात आला आहे. एरव्ही कुणाच्याही फोनवर कुणालाही सोडून देणाऱ्या पोलिसांनी मात्र डॉक्टरांनी वरिष्ठांना फोन केल्यावर देखील सोडले नाही.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाउन काळात पोलीस प्रशासनाकडून चौकाचौकात नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी दिवसभरात शेकडो नागरिकांना त्याचा फटका बसला.
शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास कालिंका माता मंदिर चौफुलीजवळ पोलिसांनी शासकीय कोविड बेड मॅनेजमेंट कक्षाचे डॉ.नितीन महाजन हे दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीके.९७२७ ने शासकीय रुग्णालयात जात होते. कालिंका माता चौफुली जवळ त्यांना पोलिसांनी अडविले.
नियमाप्रमाणे त्यांना कागदपत्रे व इतर बाबींची विचारणा करण्यात आले. डॉ.महाजन यांनी आपली ओळख दिली असता पोलिसांनी त्यांना सोडले. पुढेच १०० मीटर अंतरावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना रोखले. खाकीत नियम दाखवत पोलिसांनी त्यांना न सोडता पुन्हा विचारणा केली. डिजी लॉकरचा पासवर्ड लक्षात येत नसल्याने आणि रुग्णालयात जाणे अत्यावश्यक असल्याने अखेर डॉक्टरांनी दंड भरण्याचे मान्य केले.
एरव्ही कुणालाही चेहरापट्टी करीत २०० ते ५०० चा मेमो देणाऱ्या पोलिसांनी डॉक्टरांना चक्क १७०० रुपयांचा मेमो दिला. समोरच्या व्यक्तीची अडचण लक्षात घेता पोलिसांनी डॉक्टर महाजन यांना सवलत द्यायला हवी होती अशी अपेक्षा डॉक्टर वर्गाकडून व्यक्त होत आहे.