जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । थायलंड येथे नुकताच झालेल्या पिकलबॉल स्पर्धेत चुंचाळे ता. चोपडा येथील १६ वर्षीय स्नेहलने क्वीन ऑफ एशियाचा बहुमान मिळवला आहे.

पाच पदकाची मानकरी

थायलंडमधील फूकेत येथे झालेल्या एशिया ओपन पिकलबॉल स्पर्धेत स्नेहल किशोर पाटील हिने वेगवेगळ्या गटात चार सुवर्ण तर एक रजत पदकाची मानकरी ठरली. १९ वर्षावरील महिला एकेरी सामन्यात सुवर्ण पदकाची लूट करत स्नेहलने क्वीन ऑफ एशियाचा बहुमान मिळवला आहे. या विजयामुळे स्नेहल आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या स्पर्धेत १५ देशांचा सहभाग होता. १३ ते १७ एप्रिल दरम्यान या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका, आयोजक थायलंड येथील प्रतिस्पर्धी खेळाडूंना नमवत स्नेहलने हे यश मिळवले. स्नेहलला चुंचाळे येथील प्रा. विजय शिंदे, भूपेंद्र पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. स्नेहलने दहावीची परीक्षा दिली असून पिकलबॉलचा ती चार वर्षांपासून सराव करत आहे. चुंचाळे येथील शेतकरी किशोर भगवान पाटील यांची ती कन्या आहे.










