जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जात असून याच दरम्यान, जळगाव शहरातून पुन्हा एकदा लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे. शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ दुचाकीस्वाराकडून तब्बल १५ लाखांची रोकड जप्त केली आहे. या पैशांबाबत दुचाकीस्वार समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यामुळे पोलिसांनी हे पैसे जप्त करत कारवाई केली. सध्या या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ सायंकाळी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका दुचाकीस्वाराकडील १४ लाख ८५ हजारांची रोकड जप्त केली. संबंधित व्यक्तीला रोकडसंबंधी कुठलीही कागदपत्र सादर न करता आल्यामुळे पोलिसांनी तात्काळ ही रक्कम जप्त केली. चोपडा तालुक्यातील डी. के. पाटील नावाची ही व्यक्ती बुलेटवरून जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याच्या बॅगची झाडाझडती घेतली असता त्यात तब्बल १५ लाखांची रक्कम आढळून आली.
या रोकडसंबंधी दुचाकीस्वार डी. के पाटील यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता ते व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान पाटील यांनी हे पैसे आपल्या शेतीशी संबंधित असल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितले की, ‘नाकाबंदी दरम्यान बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडील बॅगची आम्ही तपासणी केली असता त्यात १४ लाख ८५ हजरांची रोकड सापडली. संबंधिताला पैशांविषयी व्यवस्थित माहिती न देता आल्यामुळे रोकड आम्ही जप्त केली असून पुढील चौकशी सुरू आहे.’