आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १३ कुटुंबियांना मिळणार मदत!
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । सततच्या नापीकीला तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील १३ शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडुन आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात दरवर्षी शेतमालाचे उत्पादन घटते. परिणामी मशागत व पेरणीसाठीचा खर्चही प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून भागत नाही. तसेच थकीत कर्ज फेडले जात नसल्याने बँक शेतकऱ्यांना पीक कर्जही देत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांकडे खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याशिवाय पर्याय नसतो. परिणामी शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. दरम्यान, जिल्ह्यातील १३ शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडुन आर्थिक मदत मिळणार आहे.
सततच्या नापीकीला तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी परभत कोळी रा. पिंप्री भोजना ता.मुक्ताईनगर, नारायण पाटील रा. सुकळी ता.मुक्ताईनगर, दुर्गेश दुट्टे रा. घोडसगांव ता.मुक्ताईनगर, ज्ञानेश्वर सपकाळे रा. सुनोदा ता.रावेर, देविदास पाटील रा. बोरखेडा ता.चोपडा, राजेंद्र पाटील रा. कोरपावली ता.यावल, स्वप्निल चौधरी रा.टहाकळी ता.भुसावळ, संजय जावळे रा. गोजोरे ता.भुसावळ, जगन्नाथ पाटील रा. अंजनविहिर ता.धरणगांव, प्रेमराज पाटील रा.शेरी ता.धरणगांव, विठ्ठल पाटी रा. चोरवड ता.पारोळा, प्रकाश पाटील रा. शहापुर ता.जामनेर अश्या जिल्ह्यातील एकूण १३ शेतकऱ्यांचा समावेश असून शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडुन आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये म्हणजे एक लाख रुपयांपैकी ३० हजार रोख व उर्वरीत ७० हजार पाच वर्षापर्यत दगले जाणार आहेत.