⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

१०० कोटींचा घोटाळा? जळगावात मध्यान्ह भोजन योजनेचे हजारो बोगस लाभार्थी; वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ जुलै २०२३ | महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आणि वेठबिगारांसाठी राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून या योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. एकनाथ खडसे यांनी यावेळी जळगाव जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च कलेल्या मार्च आणि एप्रिल २०२३ मधील खर्चाची आकडेवारी मांडली होती. आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जळगावात तब्बल कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी मांडली. ही आकडेवारी सादर करत अंधारे यांनी तब्बल १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. ठराविक कंपन्यांना कंत्राट दिले जाते आणि चुकीचे बिलं काढल्याचा दावा करत अंधारे यांनी या घोटाळ्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष केलं.

सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये साधारतः अडीच ते तीन हजार बांधकाम कामगार असावेत. परंतु आम्ही माहितीच्या अधिकारांत जळगाव जिल्ह्यासंबंधीची माहिती मागवली असता आम्हाला सांगण्यात आलं की, एकट्या जळगावात ३५ ते ४० हजार कामगार मध्यान्ह योजनेचा लाभ घेत आहेत. खरंतर कुठल्याच जिल्ह्यात इतके बांधकाम कामगार नसतात. तरीदेखील त्यांनी इतका मोठा आकडा सांगितला.

काय आहे घोटाळा?

मध्यान्ह भोजन योजनेवर १४ ते ३० सप्टेंबर या १५ दिवसांमध्ये ५८.६४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. तर ऑक्टोबर महिन्यात हाच खर्च वाढून २ कोटी ८७ लाख रुपये इतका वाढला आहे. हा खर्च पुढच्या काही महिन्यांमध्ये अनेक पटींनी वाढला. एकट्या फेब्रुवारी महिन्यात मध्यान्ह भोजन योजनेवर ७ कोटी ९९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तर मार्च आणि एप्रिल महिन्यात या योजनेवर २५.२७ कोटी रुपये खर्च झाला आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात या योजनेचे इतके लाभार्थी कसे काय? ते कोण आहेत, कुठून आले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सुषमा अंधारे म्हणाल्या, या योजनेतील लाभार्थ्यांची यादी आम्ही मागवली. या यादीत ज्यांची नावं आणि फोन नंबर होते त्यांना आम्ही फोन केले. तर हे लोक आमच्याशी गुजराती भाषेत बोलू लागले. आम्ही गुजरातमध्ये राहतो. कधी महाराष्ट्रात आलोच नाही, अशी उत्तरं आम्हाला मिळाली. तर काही लोकांनी सांगितलं आम्ही कर्नाटकमध्ये राहतो. त्यामुळे हे सगळे लाभार्थी खोटे असून योजनेवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये कुठे गेले असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

गुलाबराव पाटील, गिरीश महाजन लक्ष

माझ्याकडे जळगाव जिल्ह्याची माहिती आहे. गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यात काय सुरू हे पाहावे लागेल. गिरीश महाजन यांना माझ आव्हान आहे. तुम्ही जिल्हा सांगा मी तुम्हाला व्हिडिओ देते. ही सगळी कागदपत्रं भाजपने दिलेली आहेत हे देखील आम्ही सिध्द करू शकतो. पुढे देखील आमच्याकडे अनेक एपिसोड आहेत. पुढचा एपिसोड मागाठाणे विधान सभा क्षेत्राचा आहे, असा इशारा अंधारे यांनी दिला आहे. गोरगरिबांच्या तोंडातून घास काढण्याचा हा प्रकार आहे. गरिबांच्या नावावर १०० कोटी रुपये लुटावे ही गंभीर बाब आहे. मध्यान्ह भोजनाचे कंत्राट मिळालेल्या ३ कंपन्यांची चौकशी करावी अशी मागणी करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.