रूमचा दरवाजा उघडा ठेवणे महागात पडले ; विद्यार्थ्यांचे 10 मोबाईल चोरीला
जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२४ । उकाडा होत असल्याने रूमचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे विद्यार्थ्यांना महागात पडले आहे. दरवाजा उघडा पाहून भामट्याने शाहूनगरातून विद्यार्थ्यांचे ७० हजार रुपयांचे १० मोबाईल चोरून नेले. दिवस उजाडल्यावर जो-तो आपला मोबाईल शोधू लागल्याने रुमवर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शाहूनगर येथील सहयोग हौसिंग सोसायटीमध्ये भूषण राजेंद्र ठाकरे (रा. वटार, ता. चोपडा) या तरुणासह इतर त्यांचे मित्र रूम करून राहतात. सध्या प्रचंड तापमानामुळे रात्री खोल्यांची दारे उघडी करून विद्यार्थी झोपले होते. चोरट्यांनी याचाच गैरफायदा घेत त्यांच्या खोलीतून विद्यार्थ्यांचे ७० हजार रुपयांचे १० मोबाईल चोरून नेले. दिवस उजाडल्यावर जो-तो आपला मोबाईल शोधू लागल्याने रुमवर चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
अखेर विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहाला दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार सुनील पाटील तपास करीत आहेत.