⁠ 
रविवार, मे 19, 2024

तीन शेतकऱ्यांच्या शेतातून १ लाखांच्या ठिबक नळ्यांची चोरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१। चिनावल व वडगाव येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील १ लाख रुपयांच्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांची चोरी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या चोरट्यांचा शोध घेऊन तातडीने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. या आर्थिक संकटातून शेतकरी अद्याप सावरलेला नसताना चिनावलसह परिसरातील शेतांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. चिनावल व वडगाव शिवारांमध्ये चंद्रकांत मिठाराम भारंबे, चुडामण बाबूराव गारसे व नीळकंठ दयाराम गाजरे यांची शेती आहे. या शेतांमध्ये केळीची लागवड करण्यात आली असून केळी पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाच्या नळया टाकण्यात आलेल्या होत्या. मात्र, गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी या शेतातून एक लाख रुपये किमतीच्या ठिबक सिंचनाच्या नळ्या चोरून नेल्या. यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ
मागील काही दिवसांपासून शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित पीक संरक्षण संस्था व पोलिस प्रशासनाला माहिती दिली असून, चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.