⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सव्वाचार लाख ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने भरले वीजबिल

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. गेल्या मार्च महिन्यात खान्देशातील ४ लाख २० हजार ग्राहकांनी ६४ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केला.


महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे. महावितरणच्या वीजबिले ऑनलाईन भरण्याच्या आवाहनास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे. जळगाव जिल्ह्यात २ लाख ६४ हजार २६३ ग्राहकांनी ३९ कोटी ४ लाख, धुळे जिल्ह्यात १ लाख ११ हजार ९८९ ग्राहकांनी १८ कोटी ५० लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ हजार ७६८ ग्राहकांनी ६ कोटी ४३ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे.


‘गो-ग्रीन’द्वारे वर्षाला १२० रुपये वाचवा
महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.


बिलात ०.२५ टक्के सूट
ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.