विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांच्या ‘उभारी’सह नाशिक विभागाला नऊ पुरस्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णय क्षमता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविण्यात येते. या अभियानांतर्गत सहभाग घेवून सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये, अधिकारी व सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम सूचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात येते. 2021-2022 चे ही विविध पुरस्कार जाहीर झाले असून, त्यात विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांच्या ‘उभारी’उपक्रमासह नाशिक विभागाला 9 पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
ही स्पर्धा चार गटात घेवून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर हे अभियान व स्पर्धा राबविण्यात आली आहे. स्पर्धेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री पारितोषिक योजनेच्या धर्तीवर ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले होते. त्यात प्रशासकीय गतिमानता अंतर्गत मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून येणारे प्रस्ताव, राज्यातील मुख्यालयाच्या ठिकाणाहून थेट येणारे प्रस्ताव, विभाग स्तरावरील निवडक समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव, महानगरपालिका, सर्वोतकृष्ट कल्पनांतर्गत शासकीय संस्था, शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी या पुरस्कारांचा समावेश होता.
यानुसार राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव या गटात विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांना तिसऱ्या क्रमांकाचे चार लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या कार्यालयाने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतींचा अवंलब करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी ‘उभारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली बसवून ऊर्जेची बचत करीत पर्यावरणाचे संवर्धन, वॉटर हार्वेस्टिंगचा वापर, कार्यालयास हरीत इमारतीचे प्रमाणपत्र, मोफत सातबारा उताऱ्याचे वाटप आदी कार्यक्रम राबविले आहेत.