राष्ट्रीय सांघिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला दुहेरी मुकुट
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स अकॕडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सांघिक बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धा जळगावात सुरू होती. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा प्रेसिडेंट कॉटेज, अजिंठा रोड या रिसॉर्ट येथे पार पडला.
महिला गटामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण संघ १२ गुणांसह प्रथम क्रमांकाने विजयी झाला. तर पुरूष गटामध्ये सुध्दा भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला १६ गुणांसह प्रथम क्रमांकाने विजेतेपद मिळाले.सर्व बक्षीस पात्र खेळाडूंना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार विजेते ग्रॅण्ड मास्टर अभिजित कुंटे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदकुमार गादिया, आखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे पंच कमिटीचे चेअरमन धर्मेंद्र कुमार सर, जळगाव एअरपोर्ट अथॉरिटी चे सुनील मग्गरवार साहेब व्यासपिठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मंगेश गंभीरे यांनी सुत्रसंचालन केले तर नंदकुमार गादिया यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत कुंटे यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत जळगाव बुध्दिबळ संघटनेचे कौतुक केले. अशोक जैन यांच्या पुढाकारातुनच बुध्दिबळ चा प्रचार प्रसार होत असल्याचे ते म्हणाले. स्पर्धेचे प्रमुख पंच धर्मेंद्र कुमार यांनी स्पर्धेबाबत मनोगत व्यक्त केले. स्पर्धेतील सहभागी पंच अंबरीश जोशी, विनिता क्षोत्री, विवेक सोहनी प्रवीण ठाकरे, अजिंक्य पिंगळे, मंगेश गंभीरे, दीप्ती शिदोरे, अफ्रिन देशपांडे, आकाश धनगर, नंदकिशोर यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व एम पी एल फाउंडेशन व जैन इरिगेशन चे चेअरमन अशोक जैन यांनी स्विकारले होते. स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे झाली. महिला गटात 11 संघ, पुरूष गटात 22 संघ सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धेकांना सुमारे दहा लाखांचे रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.