⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

‘या’ रेल्वे गाड्यांचे भाडे कमी होणार! लोकसभेत खुद्द रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्या बंद होत्या. त्यानंतर हळूहळू रेल्वे गाड्या पुन्हा सुरु झाल्या. मात्र एक्सप्रेस मेल गाड्या सुरु असून अनेक पॅसेंजर गाड्या अद्यापही बंदच आहे. पॅसेंजर गाड्यांना एक्सप्रेसच्या दर्जा देऊन दुप्पट तिप्पट भाडे वसूल केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, आता सरकार प्रवाशांसाठी मोठे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. खरतर कोरोनाच्या कालावधीनंतर रेल्वेने बरेच बदल केले आहेत. आतापर्यंत, कोरोनाच्या कालावधीपूर्वी ट्रेनमध्ये प्रवाशांना उपलब्ध असलेल्या अनेक सवलती पुनर्संचयित केल्या गेल्या नाहीत, त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे.

प्रीमियम गाड्यांचे भाडे कमी होणार!
आता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राजधानी, शताब्दी आणि दुरंतो सारख्या प्रीमियम गाड्यांमधील डायनॅमिक भाडे काढून टाकण्याचा विचार रेल्वे करत आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला की, नकारात्मक प्रतिसाद आणि प्रवाशांची घटती संख्या पाहता सरकार डायनॅमिक भाडेप्रणाली मागे घेण्याचा विचार करत आहे का? याला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या सरकारचे फ्लेक्सी भाडे धोरण मागे घेण्याची कोणतीही योजना नाही.

अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली
रेल्वे मंत्री म्हणाले, “रेल्वे डायनॅमिक फेअर सिस्टीम ही अशी प्रणाली आहे ज्यामध्ये मागणीनुसार भाडे निश्चित केले जाते. या अंतर्गत 10 टक्के जागांच्या बुकिंगसह, भाडे 10 टक्क्यांनी वाढते. जागांची संख्या कमी झाली की भाडे वाढते. तथापि, हे सर्व प्रकारच्या गाड्यांना लागू नाही. ही व्यवस्था 9 सप्टेंबर 2016 रोजी राजधानी, शताब्दी आणि दुरंतो या गाड्यांमध्ये लागू करण्यात आली होती. पण आता अनेक मार्गांवरील रेल्वेचे भाडे विमानापेक्षा महाग झाले आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्हीत किफायतशीर असल्याने लोक विमानाने प्रवास करू लागले आहेत, त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.

रेल्वे प्रवाशांच्या संख्येत घट
रेल्वेमंत्र्यांनी माहिती दिली आहे की, कोरोनापूर्व काळात फ्लेक्सी फेअर सिस्टीममध्ये प्रवासी आणि गाड्यांमधून मिळणारे उत्पन्न नॉन फ्लेक्सीपेक्षा जास्त होते, पण तरीही सरकारचे हे धोरण मागे घेण्याबाबत कोणताही विचार केला जात नाही. रेल्वेमंत्री म्हणाले, ‘रेल्वे आणि विमानसेवा या वाहतुकीच्या दोन वेगळ्या पद्धती आहेत. त्यांची तुलना व्हॉल्यूम, कनेक्टिव्हिटी आणि सोयीच्या बाबतीत होऊ शकत नाही. विमान कंपन्यांमध्ये कमाल भाडे मर्यादा नाही तर रेल्वेने संपूर्ण वर्षासाठी कमाल भाडे निश्चित केले आहे. विमान कंपन्यांचे भाडे अनेक घटकांवर अवलंबून असते. रेल्वेचे भाडे विमान कंपनीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. तुम्ही कोणत्या वर्गात प्रवास करत आहात यावर ते अवलंबून आहे. रेल्वेने प्रवास करायचा की एअरलाइन्सने प्रवास करायचा हे प्रवाशांनी ठरवायचे आहे.’